देशात मान्सूनच्या हालचालींना वेग आला असून आता बिपरजॉय चक्रीवादळाचाही धोका देशाच्या किनारपट्टीवर येऊन ठेपला आहे. हे चक्रीवादळ येत्या ४८ तासांमध्ये आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
या चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम पाहायला मिळेल. भारतीय हवामान खात्यांना दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ३ दिवसांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र रूप घेईल. त्यामुळे या चक्रीवादळाचा परिणाम देशासह राज्यातही पाहायला मिळणार आहे.
दरम्यान केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जाहीर केलं. पुढील ४८ तासांत मान्सून आणखी प्रगती करणार असल्याचं ‘IMD’ने आपल्या अंदाजात म्हटलं आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी सोडून इतर भागांत मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातही पुढील तीन दिवस विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहणार आहे. आज अमरावती, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच १० जून रोजी अमरावती, वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात सोसायट्या वारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस तापमानात कोणतीही वाढ होणार नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
बिपरजॉय अनेक राज्यांमध्ये कहर होणार:
बिपरजॉय वादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा विध्वंस होऊ शकतो. या वादळामुळे भारतात मान्सून आतापर्यंत दाखल होऊ शकला नाही. बिपरजॉय वादळामुळे लक्षद्वीप, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसांत या राज्यांच्या किनारी भागात मोठा विध्वंस होऊ शकतो. बांगलादेशने या वादळाला नाव दिले आहे. बिपरजय म्हणजे नाश. ८ ते १२ जून दरम्यान बिपरजॉय वादळाचा कहर भारतात सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे.
गणपतीपुळेच्या समुद्रात महाकाय लाटा; दुकानांमध्ये घुसलं पाणी:
बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. कोकणातील गणपतीपुळे या पर्यटनस्थळ असलेल्या समुद्रकिनारी याचा मोठा फटका बसला आहे. समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने भरतीचे पाणी थेट किनाऱ्यावर असलेल्या दुकानांमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. समुद्राच्या मोठ्या भरतीचा फटका गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याला बसला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. समुद्राचे पाणी गणपतीपुळे येथील श्री गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी आले होते. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.