B.Ed CET: हॉल तिकीटावर आजची तारीख अन् परीक्षा कालच झाली! नाशिकमधील धक्कादायक प्रकार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये बीएड सीईटी  (B.Ed CET) परीक्षेसंदर्भात मोठा गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर आज परीक्षा होती. मात्र ज्यावेळी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले, त्यावेळी परीक्षा तर कालच झाल्याचे महाविद्यालयत परीक्षा केंद्राकडून सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले.

यावेळी युवक काँग्रेस आणि शिक्षक आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यानंतर या विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयात परीक्षेसाठी हलवण्यात आल्याचे समजते.

एकीकडे राज्यात स्पर्धा परीक्षांसह इतर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी जीवाचं रान करत आहेत. मात्र दुसरीकडे स्पर्धा परीक्षा आयोजकांकडून भोंगळ कारभार समोर येत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी एमपीएसी विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे सोशल मीडियावर लीक झाल्याची घटना घडली होती. आता बीएड सीईटी संदर्भात गोंधळ उडाला आहे.

नाशिकमध्ये एका केंद्रावर परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालच झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. दुसरीकडे विद्यार्थ्यांकडे असलेल्या प्रवेशपत्रांवर मात्र आजची तारीख असल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले.

हे ही वाचा:  SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; इथे पहा निकाल…

सत्यजीत तांबेंकडून पाठपुरावा, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दोन महाविद्यालयात पाठवले:
नाशिकच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात आज सकाळी 9 ते 10.30 वाजेच्या दरम्यान बीएडसाठी प्रवेश पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र हॉल तिकीटावर आजची तारीख देण्यात आलेली असताना परीक्षा केंद्रावर काल परीक्षा होऊन गेल्याचं महाविद्यालयाकडून सांगण्यात येताच इथे एकच गोंधळ उडाला होता. युवक काँग्रेस आणि शिक्षक आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यानंतर या विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयात परीक्षेसाठी हलवण्यात आले.

आज सकाळी 11 वाजता JMCT आणि JET महाविद्यालयात ही परीक्षा होणार आहे. या सर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून हे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरुन नाशिकमध्ये येऊन पोहोचले होते. दरम्यान शासनाचे ऑनलाईन एक्झाम घेण्याचे कंत्राट ज्या EDU SPARK कंपनीकडे आहे. तिच्यावर कारवाईची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 'या' सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

सीईटी सेलकडून स्पष्टीकरण, सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार:
दरम्यान विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट वर आजची 26 तारीख असून बीएड सीईटीची परीक्षा मात्र कालच झाल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. आज सकाळी नऊ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत ही परीक्षा होणार होती. नाशिकसह जिल्हाभरातून आणि धुळे, नंदुरबार, जळगाव आधी परिसरातून नाशिकला विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते. तसेच नागपूरच्या परीक्षा केंद्रावरही असाच गोंधळ झाला असून विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. बीएड सीईटी सेलचा कारभार समोर आल्याने विद्यार्थी चांगले संभ्रमात पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांचे केंद्र बदलले असल्याचा मेसेज विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला होता. मात्र विद्यार्थी जुन्या हॉल तिकिटावर असलेले परीक्षा केंद्र पाहून परीक्षेसाठी गेले. दरम्यान अशा सर्व उमेदवारांना जीएस रायसोनी, नागपूर परीक्षा केंद्रावर रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व उमेदवारांना सामावून घेतले जात असल्याचे म्हटले आहे. हॉल तिकीटावर कुठलीही तारीख असली तरीही आज ज्या दिवशी ज्या उमेदवारांची परीक्षा नियोजित होती त्यांची परीक्षा वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेतली जाईल. ज्या कंपनीमार्फत ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाते त्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली असून यासंदर्भात कारवाई केली जाईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group