नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिस आयुक्तालयात बदली होऊन आलेल्या सहायक पोलिस आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये नव्याने फेरबदल केले आहेत. आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये हे बदल करण्यात आले.
यात, डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे शहर गुन्हे शाखा, सचिन बारी यांच्याकडे विशेष शाखेसह शहर वाहतूक शाखेची अतिरिक्त जबाबदारी तर, सोमनाथ तांबे यांच्याकडे पोलिस मुख्यालय-प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या जाहीर झाल्या होत्या. यात शहर आयुक्तालयासाठी पाच सहायक पोलिस आयुक्तांचा समावेश होता. त्यानुसार, पदोन्नतीने डॉ. सीताराम कोल्हे, नितीन जाधव, सचिन बारी, सोमनाथ तांबे आणि शेखर देशमुख यांनी नाशिक आयुक्तालयात रुजू झाले होते.
डॉ. कोल्हे यांच्याकडे पोलिस मुख्यालय-प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली होती. तर, सचिन बारी हे रुजू झाल्यानंतर विशेष शाखा, शेखर देशमुख यांच्याकडे अंबड विभागाची तर, नितीन जाधव यांच्या वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली होती.
तर, नाशिक ग्रामीणमधून जूनअखेरीस रुजू झाले होते. नवीन सहायक आयुक्त रुजू झाल्यानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल केले आहेत.
नवीन आदेशानुसार, डॉ. कोल्हे यांच्या शहर गुन्हे शाखा, तर सोमनाथ तांबे यांच्याकडे पोलिस प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली.
त्याचप्रमाणे, नितीन जाधव यांच्याकडे पंचवटी विभागाची जबाबदारी सोपविली तर, सचिन बारी यांच्याकडे विशेष शाखेसह शहर वाहतूक शाखेची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. शेखर देशमुख यांच्याकडील अंबड, अंबादास भुसारे यांच्याकडील नाशिकरोड आणि सिद्धेश्वर धुमाळ यांच्याकडील सरकारवाडा विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे.