
नाशिक। दि. १५ मार्च २०२६: जागतिक किडनी दिनानिमित्त अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “निरामय जीवन विजय सोहळा – निरोगी किडनीद्वारे” हा प्रेरणादायी कार्यक्रम कालिदास कलामंदिर, नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अपोलो हॉस्पिटल्स मधील किडनी प्रत्यारोपण विभागाच्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. नितीन ठाकरे (सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक संस्था, नाशिक) व श्री. दिप्तेंदु पांडा अपोलो हॉस्पिटल्स सि.ओ.ओ उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक यांनी आरोग्यसेवेत आधुनिक तंत्रज्ञान व समर्पित सेवेद्वारे उल्लेखनीय कार्याबद्दल शुभेच्छा देत, अवयव दान व किडनी प्रत्यारोपणाद्वारे अनेकांना नवजीवन देण्याचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले तसेच सहजीवनाचे ५० वर्ष पूर्ण केल्याल्या दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात अपोलो हॉस्पिटल्समध्ये यशस्वीरीत्या किडनी प्रत्यारोपण होऊन आज निरोगी व आनंदी जीवन जगत असलेल्या २०० पेक्षा अधिक रूग्णांना निमंत्रित करण्यात आले व विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या नवजीवनाचा आनंद साजरा करण्यासाठी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते किडनी प्रत्यारोपणानंतर निरोगी जीवन जगत असलेल्या रुग्णांचे मनोगत. अत्यंत भावूक वातावरणात रुग्णांनी आपल्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांची आठवण सांगितली. आजारपणामुळे आलेले दुःख, भीती आणि संघर्ष याबद्दल बोलताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मात्र अशा कठीण परिस्थितीत डॉ प्रकाश उगले व डॉ प्रवीण गोवर्धने, व संपूर्ण वैद्यकीय टीमने योग्य मार्गदर्शन, उपचार, आधार आणि विश्वास देत त्यांना नवजीवन दिल्याची कृतज्ञ भावना रुग्णांनी व्यक्त केली.त्यांच्या अनुभवांनी उपस्थितांना भावूक केले तसेच इतर रुग्णांसाठीही आशा आणि प्रेरणेचा संदेश दिला.
कार्यक्रमात किडनी आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रश्नोत्तरांचे चर्चासत्र घेण्यात आले आले. त्यात डॉ. प्रकाश उगले (किडनी रोग व किडनी प्रत्यारोपण तज्ञ) आणि डॉ. प्रविण गोवर्धने (किडनी रोग व किडनी प्रत्यारोपण सर्जन) यांनी लोकांचे शंकानिरसन करीत किडनी रोग प्रतिबंध, उपचार व प्रत्यारोपणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत, नागरिकांना नियमित तपासणी करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
तसेच लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने लग्नाच्या ५० वर्षांचा सुवर्णमहोत्सव पूर्ण केलेल्या ५० ज्येष्ठ दांपत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राच्या अध्यात्मिक व सामाजिक परंपरेचे दर्शन घडवणारे आणि श्री विठ्ठल माऊलीच्या वारीचा जिवंत अनुभव देणारे “पालखी” हे नामांकित नाटक. या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेत जितेंद्र येवले, रंजनभाई शाह, बाळकृष्ण दंडगावकर, रमेश डहाळे, डॉ. चेतन भंडारी, डॉ. ज्योती उगले, देवेंद्र वाघ, संदीप शिंदे व सौ. चारुशीला जाधव यांचे सहकार्य व उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, विविध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक यांच्या टीमचे कौतुक केले.
आरोग्य जनजागृतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवण्याचा संकल्प अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
![]()

