नाशिक (प्रतिनिधी): अशोकनगरच्या जाधव संकुल परिसरात शिवसैनिकासह चौघांवर संतोष ढमाळ नामक इसमाने चाकूचे वार करत प्राणघातक हल्ला केला. ऐन भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून पोलिसांनी हल्लेखोरास अटक केली आहे. शनिवारी (दि. ६)सायंकाळी जाधव संकुलमधील अहिल्याबाई चौक परिसरात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व भाऊसाहेब भिकाजी जाधव यांच्या फिर्यादीनुसार हल्लेखोर संतोष ढमाळ याचे त्याचा भाऊ संजय ढमाळ याच्याशी भांडण सुरू होते. त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या जाधव नामक व्यक्तीने मध्यस्थी करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने हल्लेखोराने जाधव यांचा मुलगा सागर जाधव याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर काही वेळाने दूध घेण्यासाठी दुकानात गेलेल्या राजू गवळी याच्यावर हल्ला केला. शिवसैनिक श्याम फर्नांडिस याच्या पोटावर चाकूने वार केले. फर्नांडिस यांनी जखमी स्थितीत पोलिस ठाणे गाठून हल्ल्याबाबतची माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संतोष मानसिंग ढमाळ (४६) याच्या विरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.