नाशिक: कॉलेज, शासकीय, निम शासकीय कार्यालयात ‘नो हेल्मेट-नो एन्ट्री’
नाशिक (प्रतिनिधी): पेट्रोलपंपावर विनाहेल्मेट पेट्रोल देण्यास बंदीच्या कारवाईला शहरात प्रचंड प्रतिसाद मिळाला.
याच अनुषंगाने आता शहरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी क्लासेस, सर्व पार्किंग ठिकाणे, औद्योगिक वसाहत परिसर, शासकीय कार्यालये, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व कॅन्टाेन्मेंट परिसर व इतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात आता विनाहेल्मेट प्रवेश मिळणार नाही.
६ नोव्हेंबरपासून या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरात २९ जुलै पासून विनाहेल्मेट दुचाकीचालकाला पेट्रोल न देण्याचे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी काढले. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकांकडून पेट्रोलपंपावर वाद होत असल्याने पंपावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केल्याने पंपावर या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी अद्याप सुरु आहे.
विनाहेल्मेट दुचाकीचालकास पेट्रोल विक्री केल्यास संबंधित पंपचालकाचा ना हरकत परवाना रद्द करण्याची तरतूद पोलिस आयुक्तांच्या आदेशात नमूद असल्याने पंपचालकांकडून या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. विशेष म्हणजे पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासण्यात येत असून संबंधित पंपचालकांकडून याची नियमित माहिती घेतली जात आहे.
विनाहेल्मेट दुचाकीचालक सीसीटीव्हीमध्ये आढळून आल्यास त्याच्याकडून अर्ज भरून घेतला जात आहे. अर्ज भरून दिलेल्या वाहनचालकाच्या घरी नोटीस देऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असल्याने शहरात आता बहुतांशी दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. याच आदेशाच्या अनुषंगाने आता शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी क्लासेस, सर्व पार्किंग ठिकाणे येथे आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही.
या ठिकाणीदेखील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे संबंधित कार्यालयांना अनिवार्य राहणार आहे. या कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीचालक आढळून आल्यास संबंधित चालकावर महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. या गुन्ह्यात ८ दिवस तुरुंगवास आणि १२०० रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.