विनापरवानगी होर्डिंग्ज; आदेशाला केराची टोपली; पाहणीत आढळले विनापरवानगी होर्डींग्ज

विनापरवानगी होर्डिंग्ज; आदेशाला केराची टोपली; पाहणीत आढळले विनापरवानगी होर्डींग्ज

नाशिक (प्रतिनिधी): शहरात लावण्यात येणाऱ्या प्रत्येक फलकावर पोलिसांची परवानगी आणि नंबर असेल तरच ते फलक अधिकृत समजले जातील अन्यथा फलकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिले होते.

प्रत्यक्षात शनिवारी (दि. १६) सायंकाळी पोलिस आयुक्तांनी पायी फिरून शहरातील फलकांची पाहणी केली असता बहुतांश फलकांवर पोलिसांची परवानगीच नसल्याचे दिसून आल्याने आयुक्तांच्या सूचनांना केराची टोपलीच दाखविल्याचे निदर्शनास आले.

८ ऑक्टोबरपासून अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

फलक लावण्यासंदर्भात सर्व अधिकार मनपा आयुक्तांना आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिस आयुक्तांची सहकारी आणि दंडाधिकाऱ्याची भूमिका आहे. फलक लावण्यापूर्वी पोलिसांकडून फलकावरील मजकूर तपासणी करून प्रमाणित केल्यानंतरच फलक लावण्याची परवानगी दिली जाणार आहे. मनपाच्या अधिकृत ठिकाणीच हे फलक लावण्यात यावे असे आदेश आहेत. अनधिकृत ठिकाणी फलक लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. शहरात मनपाने दिलेल्या परवानगी आणि अधिकृत ठिकाणी ८ ऑक्टोबरपूर्वी बहुतांशी ठिकाणी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांनादेखील पोलिसांची परवानगी अनिवार्य आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

काय आहे अधिसूचना : शासन नगरविकास विभागाच्या १ जून २००३ च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने अशा जाहिरातीद्वारे सार्वजनिक नीतिमत्ता आणि सभ्यता यांचे उल्लंघन होण्याचा संभव असतो. महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये सार्वजनिक शांतता किंवा सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी चित्रे, चिन्हे, फलक, तयार करणे, त्याचा प्रसार करणे, प्रदर्शन करण्यावर प्रतिबंध घालणे मनाई करण्याचे अधिकारी पोलिस आयुक्तांना दिले आहेत. ज्या फलकांवर पोलिस आयुक्त यांच्या आदेशाचे क्रमांक नमूद नाही ते फलक अनधिकृत समजले जाणार आहे. फलकावरील व्यक्ती संघटनेचे नाव असेल तर त्या व्यक्ती अथवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी प्रक्रियासंहिता कलम १०७ प्रमाणे कारवाई केली जाईल. अनधिकृत फलकांवर कारवाई महापालिका करेल. नगर विकास अधिसूचनेच्या अनुषंगाने मनपा शासकीय, खासगी जागेत जाहिरात फलकांना परवानगी देतील. फलकावरील मजकूर फलक तयार करण्यापूर्वी आणि लावण्यापूर्वी पोलिस आयुक्त यांच्याकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असणार आहे. पोलिस आयुक्तांचे प्रमाणपत्र दिल्यानंतर फलक लावण्यास परवानगी दिली जाईल. फलकावर पोलिस आयुक्त परवानगी क्रमांक, मुदत, अर्जदाराचे नाव, आदी नमूद असेल. महापालिकेने प्राधिकृत केलेल्या जागेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी फलक पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फ्लेक्स आदी लावण्यावर पूर्णपणे प्रतिबंध असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम चे कलम १३५ अन्वये कमीत कमी ४ महिने व १ वर्षपर्यंत कारावास शिक्षेची तरतूद आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790