देवळाली कँम्पला एका फ्लॅटवर सुरु होती बेटिंग

नाशिक (प्रतिनिधी): आयपीएल मॅचवर बेटिंग घेणाऱ्या बुकीकडून खासगी व्यक्तीच्या मध्यस्थीने तब्बल ३ लाखांची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनरीक्षकासह मध्यस्थालाही लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात अटक केली.
महेश वामनराव शिंदे (वय ३८) असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे.
संजय आझाद खराटे असे मध्यस्थाचे नाव असून नाशिकरोड येथे पथकाने ही कारवाई केली.
रात्री उशिरापर्यंत शिंदे याच्या निवासस्थानी झडती सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि तक्रारदारानुसार, देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आयपीएल सामन्यांवर बेटिंग सुरू असल्याच्या तक्रारी आल्या असल्याचे सांगत गुन्हे दाखल न करण्यासाठी या पुढे बेटिंग सुरळीत ठेवण्यासाठी ४ लाखांच्या लाचेची मागणी केली. खराटे यास तीन लाख देण्याचे उपनिरीक्षक शिंदे याने सांगितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. पथकाने खराटेस ३ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली. सापळा अधिकारी जयंत शिरसाठ, अभिषेक पाटील, मीरा आदमाने, प्रफुल्ल माळी, नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन, शिरीष अमृतकर, संतोष, गांगुर्डे यांच्या पथकाने अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली रचला.