त्र्यंबकला श्रावण महिन्यात जमावबंदी

त्र्यंबकला श्रावण महिन्यात जमावबंदी

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर येथे सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर कोविडची तिसरी लाट व डेल्टा व्हायरसच्या प्रसारामुळे रुग्णसंख्या वाढू नये यासाठी शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ चौक, निवृत्तिनाथ मंदिर परिसरात गर्दी करू नये व दर्शन व्यवस्था बंद असल्याने येथे बाहेरील भाविकांना व पर्यटकांना मज्जाव म्हणून जमावबंदी आदेश लागू केला असल्याचे उपविभागीय अधिकारी यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी त्र्यंबकेश्वर, इगतपुरीचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी मंदिर परिसरात व गर्दी होणाऱ्या भागात पाहणी करून व्यवस्थेबाबतचा आढावा घेतला. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यास प्रतिबंध असल्याने प्रदक्षिणा मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

परिसरात गर्दी होऊ नये यादृष्टीने सर्वत्र खबरदारी घेतली जात असून यासाठी तीन पोलिस निरीक्षक, नऊ उपनिरीक्षक व ९५ पोलिस कर्मचारी असा मोठा पोलिस ताफा यासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. कोविड महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी श्रावणात येथील मंदिरे बंद राहणार आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेवरील बंदीमुळे व्यावसायिकांना उत्पन्नास मुकावे लागत असल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790