नाशिकमध्ये खरोखरच निर्बंध शिथिल होणार का ?
नाशिक (प्रतिनिधी): ज्या जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संसर्ग दर राज्याच्या दरापेक्षा कमी आहे अशा नाशिकसह २५ जिल्ह्यांतील कोरोना टाळेबंदीचे निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार आहेत. स्तर तीनमध्ये असलेल्या ११ जिल्ह्यांत मात्र ‘जैसे थे’ निर्बंध राहतील, असे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. अर्थात हे निर्बंध कधीपासून शिथिल होणार याविषयी निश्चित माहिती नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत गुरुवारी राज्य कोरोना कृती दल आणि आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक पार पडली. त्या बैठकीत कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. कृती दलाच्या सदस्यांनी १५ आॅगस्टपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याची सूचना केली आहे. यासंदर्भात राज्याचा आरोग्य विभाग आणि कोरोना कृती दलाने स्वतंत्र अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला असून त्याचा अभ्यास केल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
राज्यात ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग दर कमी झाला आहे. तेथे दुकाने, सलून, हॉटेल यांना रात्री ८ पर्यंत मुभा देण्यात येईल. व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांना ५० टक्के क्षमतेने उघडण्यास संमती मिळेल. आठवड्यातील सध्याची शनिवार-रविवारची दोन दिवसाची दुकानांची टाळेबंदी एक दिवस केली जाईल. शनिवारी सायंकाळी ४ पर्यंत दुकानांना परवानगी देण्यात येईल. विवाह सोहळ्यांसाठी उपस्थितांना १०० पर्यंत मुभा देण्यात येईल. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम सध्या पूर्णपणे बंद आहेत. अशा कार्यक्रमांना उपस्थितांच्या संख्येची मर्यादा घालून मुभा देण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांच्या आजच्या बैठकीकडे लक्ष:
जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कुठला निर्णय घ्यायचा याचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनास आहेत. त्यासाठी शुक्रवारी (दि.३०) दुपारी ४ वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यात निर्बंध कायम ठेवायचे की शिथिल करायचे याचा निर्णय होईल. त्यामुळे आता व्यावसायिकांसह सर्वांच्या नजरा या बैठकीकडे लागून आहेत.
तुमच्याकडे बंगला आहे, फ्लॅट आहे.. मला दर महिन्याला पंधरा हजार द्या, नाही तर…
प्रशासनाला आली जाग: खून झाल्यानंतर सिडकोतील सोनाली हॉटेल सील..