नाशिक (प्रतिनिधी): स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या कामात दिरंगाई केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश थविल हे वादाच्या भोवर्यात सापडले होते.
महासभेत प्रकाश थविल यांच्या कार्यपद्धतीवर वारंवार ताशेरे ओढले जात होते. शहरात ठिकठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामांसंदर्भात तक्रारी वाढत असल्याचं महासभेत सांगितलं जात होतं. दरम्यान दोन दिवसापूर्वी झालेल्या महासभेत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची बदली करण्यात यावी अशी एकमुखाने मागणी करण्यात आली होती. आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटीची विशेष बैठक पंचवटी येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
या सभेला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महापौर सतीश कुलकर्णी, वादग्रस्त अधिकारी प्रकाश थविल त्याचबरोबर नगरसेवक गुरुमित बग्गा, अजय बोरस्ते हे देखील उपस्थित होते.
सभा सुरू होताच महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रकाश थविल यांच्या तक्रारीचा पाढा वाचला, आणि त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे करण्यात आली. सभा सुरू असतानाच प्रकाश थवील यांच्या बदलीचे पत्र बैठकीत प्राप्त झाले आहे. राज्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या सहीचे पत्र प्राप्त होऊन प्रकाश थविल यांच्या जागी स्मार्ट सिटी चे नवीन अधिकारी म्हणून सुमंत मोरे हे कामकाज पाहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आल्याचं सचिन सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.