नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील पवननगर भागात जादूटोणा भोंदूगिरीचा गैरप्रकार सुरू असल्याची घटना सामजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली. विशेष म्हणजे मनपाच्या पवननगर स्टेडियमच्या एका खोलीतच हा प्रकार सुरू होता. याबाबत अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
पवननगर स्टेडियम येथील मनपाच्या जागेत असलेल्या सुलभ शौचालयाच्या वर एका रूममध्ये ४ ते ५ लाख रुपये किमतीच्या दोन हजाराच्या नकली नोटा तसेच २ काळ्या रंगाच्या कोंबड्या, अंडी, भगवे वस्त्र, शंख, मोहिनी वनस्पती यासह जादूटोण्याच्या वस्तू आढळून आल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते भगवान मराठे यांनी उघडकीस आणला. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.
या ठिकाणी वास्तव्यास असणारा भोंदूबाबा फरार झाला. अनेक दिवसांपासून या खोलीमध्ये रात्रीच्या वेळी काही नागरिकांना बोलावून तंत्र मंत्राद्वारे पूजाविधीचा देखावा मांडून भोंदूगिरीचा तसेच जादूटोण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी जादूटोण्याच्या नावाखाली कोणाशी फसवणूक झाली आहे की काय? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.