सई जाधव, नाशिक
22 मार्च 2020 भारतात पहिला जनता कर्फ्यू पाळला गेला. आणि 24 मार्च रोजी 21 दिवसांसाठी भारतात लॉकडाऊन जाहीर केला गेला. 14 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपणार अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता हा लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला गेला म्हणजेच आता तब्बल ३९ दिवसांनी हा लॉकडाऊन शिथिल होईल अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. या लॉकडाऊनचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वाधिक प्रमाणात जाणवला. त्याचसोबत प्रत्येक भारतीयाच्या वैयक्तिक जीवनात देखील हा लॉकडाऊन कायमची अशी एक ऐतिहासिक आठवण ठेवून जाणार कारण इतिहासात पहिल्यांदाच सर्वच धार्मिक स्थळांची दारं बंद करण्यात आली…
माणूस माणसापासून काही मीटरच्या अंतरावर दूर उभा राहून संवाद साधतोय तर बरीचशी मंडळी गेल्या 39 दिवसात घराबाहेर देखील पडलेली नाही. जे जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर जात होते ते दुरूनच आपल्या ओळखीच्या व्यक्तीला डोळेभरून बघत होते. तर काही ठिकाणी “काय माहित, या रांगेत कुणाला कोरोना तर नसेल ना..?” या भीतीने साहजिकच थोडासं अंतर ठेऊन ओळखीच्या माणसांना देखील जरा टाळतच होते. कारण शेवटी प्रत्येक जण आज याच प्रयत्नात आहे, की मी आणि माझं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि याच काळजीपोटी किंवा कोरोनाच्या भीतीपोटी अगदी सर्वसामान्य माणसापासून मोठ्यातला मोठा अधिकारी, उद्योगपती आणि राजकीय नेता घरात जाण्याआधी घराबाहेरच स्वत:ला सॅनिटाईज करतोय. आणि हात पाय घराबाहेरच धुतोय, आणि घरात आल्यावर आंघोळ करतोय. सरकारी काम करणारा पिता असु देत, किंवा पत्रकार असु देत घराबाहेर रोज कामासाठी बाहेर जाणारी कर्मचारी आई असुदेत किंवा मुलगी असुदेत… फार्मा आणि डॉक्टर असलेली बहिण असू देत किंवा भाऊ असू देत ही मंडळी घरी आल्यानंतर आवर्जून आपल्या घरच्यांची काळजी घेताय. थोडक्यात काय तर माणूस या आधी बाहेरच्या लक्झरीयस गोष्टींकडे जास्त आकर्षित होत होता, परंतु आज त्याच्यासाठी फक्त आणि फक्त त्याचं कुटुंबच सर्वकाही आहे.
मग आता या लॉकडाऊनच्या काळात घरी लॉकडाऊन असलेल्या या कुटुंबांमध्ये नक्की काय वातावरण होतं आणि काय मानसिकता होती…
तर बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की पुरुषांनी घरी बसून बोर होतंय किंवा वर्क फ्रॉम होम केल्यावर पुढे काय करायचं… तर बऱ्याच पुरुष मंडळीनी आपला मोर्चा स्वयंपाक घरात वळवलेला दिसला.. अर्थातच आईला, बहिणीला, पत्नीला काहीतरी नवीन रेसिपीज आयत्या खायला मिळाल्या खरं, पण बऱ्याचदा त्यानंतर किचेनमधला पसारा आवरतांना महिलांच्या नाकी नऊ आले. पण यातही कौटुंबिक बॉण्डिंग अधिक स्ट्रॉंग होतांना दिसलं. पण काही ठिकाणी याच्या विरुद्ध चित्र दिसलं. घरातील गृहिणी ही फक्त वेगवेगळ्या डीशेस घरच्यांच्या ऑर्डर प्रमाणे बनवून देत होती. आणि घरातील कामं करत होती. ती कामं वेळेच्या आत किंवा घरच्यांच्या मर्जीप्रमाणे नाही झाली तर ती बिचारी घरगुती वादाला देखील सामोरी जातांना दिसली. खरं तर या काळातसुद्धा घरातल्या स्त्रीला अशी वागणूक मिळणं हे माणुसकीला लाजवणारं वर्तन होतं.
याच लॉकडाऊनच्या काळात घरातल्या चिमुरड्यांची काय अवस्था… तर मज्जाच मज्जा ! आता शाळेला सुट्टी, सकाळी लवकर उठून अर्ध्या झोपेत तयार होऊन स्कूल बसमध्ये डुलक्या घेत शाळेत जायचं नाही.. शिवाय आता रोज कामावर जाणारे आजोबा, आईवडील घरीच आहेत. आई, वडील, आजी, आजोबा, काका आणि आत्या सगळी मंडळी आपल्यासोबत घरी खेळताय, आपल्याला वेळ देताय.. हा लॉकडाऊन असाच असावा आणि ही सगळी माणसं आपल्यासोबत अशीच घरी असावी रोज, अशी काहीशी मनाची अवस्था चिमुरड्यांची झालीये. पण दुसरीकडे हळूहळू ही मुलं कोरोनाच्या येणाऱ्या बातम्यांमुळे कुठेतरी धास्तावत देखील आहे. सारखं सारखं हात धुणं, सॅनिटायजर वापरणं शिकली.. घराबाहेर जाता येईना..खेळायला मित्र भेटेना. रोज गाडीवर चक्कर मिळेना, “बाहेर कोरोना आहे, बाबा तुम्हीपण बाहेर जाऊ नका” असा वडिलांना सांगताना आपसूकच किती मॅच्युअर झाले हे चिमुरडे…!
म्हणजे आता यापुढे शाळेत जातांना, त्यांच्या स्कूल बॅग्समध्ये, पाणी बोटल आणि टिफिनइतकाच आवर्जून सॅनिटायजरपण ठेवलं जाणार.
आता घरातील सिनिअर सिटीझन्स सध्या काय करताय…
सध्या आजी आजोबा कोरोनामुळे थोडेसे घाबरले आहेत, पण स्वत: पेक्षा नातवंडाना जपण्यात त्यांच्याशी खेळण्यात तर बऱ्याचदा नातवंडाना कोरोनाचीच गोष्ट सांगून झोपी लावणारे आजी आजोबा आपल्या अनुभवांचा उपयोग करून कधी आपल्या मुलाला, सुनेला, मुलीला, जावयाला धीर देताय. ही वेळ देखील निघून जाईल असं सांत्वन करताय. पण स्वत: मात्र कधीतरी खूप खोलवर, गहन विचारात बुडालेले दिसताय.. अशातच सगळेजण फोन करून का होईना पण एकमेकांना धीर देताय. कळत न कळत का होईना आज समाजात बाहेर काम करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला घरात गृहिणी असणारी बायको किंवा आई याचं काम खरंच किती महत्वाचं आहे हे प्रत्यक्ष बघून बुद्धीला पटत देखील आहे. आज घर सांभाळणारी बायको किंवा आईचा आपल्या यशात खरोखरच किती महत्वाचा वाटा आहे. आपल्या यशाचं श्रेय हे तिचं देखील आहे हे कित्येक पुरुषांना जाणवलं ! पण या सोबतच घराच्या प्रमुख कर्त्याच्या डोक्यात असेलेले विचार हे काही वेगळेच.. अर्थातच कर्ज काढून चालवलेला बिझिनेस असेल, घराचे हफ्ते असतील किंवा त्याच्या कंपनीत काम करणारे मजूर असतील.. त्यांच्या जेवणाची आणि वैद्यकीय सेवांची जबाबदारी तो पार पाडतोय खरं.. पण हे असं किती दिवस…? उद्योजक तरी हे किती दिवस पेलू शकेल ?
तर दुसरीकडे कामगार वर्गातील घरातील कर्ता पुरुषदेखील हाच विचार करतोय.. या दरम्यान त्याच्याही उधाऱ्या झाल्या असतील.. अशी चिंता सर्वांनाच सतावत असतांना आपण समाजासाठी देण लागतो…या भारतीय संस्कृतीचा सगळेच अवलोकन करीत खारीचा वाटा म्हणून समाजासाठी प्रत्येक जण काहीतरी मदत करत आहे… आणि सामाजिक बांधिलकी जपत आहे. सोबतच मनातून एकाच प्रार्थना त्या विधात्याला करत आहे. लवकरात लवकर हा कोरोना जाऊ दे. आणि हे जग पूर्ववत आनंदी होऊ देत..!