नाशिक (प्रतिनिधी): हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्या भावाशी शिवीगाळ आणि धक्काबुक्की तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पंचवटीत मंगळवारी (दि. १८ मे) घडला आहे. याप्रकरणी महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादिप्रमाणे आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारी महिला ही कामावर जात होती. हॉस्पिटलचा जिना चढत असताना सोमनाथ वारे या युवकाने तिला थांबवले आणि “तू मला खूप आवडते, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो” असे म्हणाला. यावर “माझे लग्न झालेले आहे आणि मला मुलं आहेत, मला त्रास देऊ नको” असे उत्तर सदर महिलेने दिले. यावेळी सोमनाथ वारेने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्या महिलेसोबत केले. त्याचप्रमाणे तिला जिन्यावरून खाली ओढत, शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली.
या महिलेने घडलेला सर्व प्रकार तिच्या भावाला सांगितला. त्यानंतर महिलेचा भाऊ या युवकास समजावून सांगण्यासाठी गेला असता त्यालासुद्धा सोमनाथ वारे याने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. शिवाय “माझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे, जर लग्न केले नाही तर तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेल” अशी धमकीही या युवकाने दिली.
महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सदर युवक सोमनाथ नारायण वारे (वय ३६, राहणार- दरबार रोड, जुने नाशिक) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.