नाशिक (प्रतिनिधी): पत्नीचा खून करून तब्बल अकरा वर्षापासून फरार असलेल्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दिंडोरी येथे दोनशे ते तीनशे मजुरांची चौकशी केल्यानंतर संशयित अाराेपीची ओळख पटली. काशिनाथ बाळू पवार असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ११ ऑगस्ट २०११ रोजी आडगाव शिवारात सय्यद पिंपरी रोडवर चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून झाला होता. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून संशयित फरार होता. अाेळख पटविण्यासाठी त्याचा फोटो देखील मिळत नव्हता. त्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान होते. गुन्ह्याचा तपास करत असताना तो चिंच ओहळ त्र्यंबक येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पथकातील उत्तम खरपडे यांनी गावात आठवडाभर मुक्काम केला. मात्र तो अनेक दिवसांपासून गावात आला नसल्याचे सांगण्यात आले. खबऱ्याने काशिनाथ पवार दिंडोरीमध्ये शेतमजुरी करत असल्याचे सांगितले. पथकाने त्याचे वर्णन वरून दिंडोरीमध्ये सुमारे दोनशे मजुरांची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, सत्यवान पवार, विलास चरोस्कर, उत्तम खारपडे, कुणाल पाचलोरे, नितीन जगताप यांच्या पथकाने कारवाई केली.