नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये १२ मेपासून कडक लॉकडाऊन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आदल्याच दिवशी भाजीपाला घेण्यासाठीसुद्धा प्रचंड गर्दी केली. त्यामुळे आता १२ मेपासून दुध आणि भाजीपाला कशा पद्धतीने मिळणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दूर केला आहे.
दूध आणि भाजीपाला हे दोन्ही पदार्थ अतिशय नाशवंत असल्याने त्याची दैनंदिन विक्री होऊ देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा उत्पादक आणि ग्राहक या दोघांची अत्यंत गैरसोय होईल. दूध घरपोहोच विक्री होईल अशी सूचना आहे. पुढच्या दोन दिवसांत सर्व दूधवाल्यांनी घरपोहोच विक्रीची व्यवस्था करायची आहे. जुन्या ऑर्डरमध्ये भाजी बाजार व बाजार समित्या खुल्या होत्या. त्यामुळे तिथे लोकांची खूप गर्दी व्हायची.
नव्या आदेशानुसार भाजी बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्याऐवजी त्या-त्या भागांमध्ये रस्त्याच्या कडेला आखून दिलेल्या ठिकाणी ठराविक अंतराचे नियम पाळून सकाळी ७ ते दुपारी बारा या वेळेत एक-एक भाजी विक्रेता बसू शकेल. त्यांच्यासमोर ग्राहकांनाही उभे राहण्यासाठी बिंदू आखून दिले जाणार आहेत. त्यामुळे सध्या भाजी बाजारात होणारी गर्दी टाळली जाईल. त्याउपरही पुन्हा लोकांनी शिस्त पाळली नाही वा गर्दी केली तर दोन दिवसांनी पुढचा निर्णय घेतला जाईल. दुसऱ्या लाटेवर मात करण्याची ही शेवटची संधी आहे.