नाशिक (प्रतिनिधी): शिंदेगाव ते नायगाव रस्त्यावरील विदेशी मद्याच्या गोडावूनचे शटर मध्यरात्री तोडून तीन अज्ञात व्यक्तींनी गोडावूनमधील २७ लाख रुपयांच्या मद्याची चोरी केली. यावेळी येथील सुरक्षारक्षकाला चोरांनी मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि राजस्थान लिकर लि. कंपनीचे व्यवस्थापक दीपक दत्तात्रय नाईक यांच्या फिर्यादीनुसार, शिदेंगाव येथे नायगाव रस्त्यावर राजस्थान लिकरचे विदेशी मद्याचे गोडावून आहे. या ठिकाणी विविध कंपनीच्या मद्याचा साठा ठेवण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री तीन अज्ञात व्यक्तींनी लोहिया कम्पाउंंडमधील सुरक्षारक्षक मयूर शांताराम मगर हा खोलीत झोपलेला असताना त्याला दारूचे गोडावून कुठे आहे अशी विचारणा केली. माहिती नसल्याचे सांगताच मगरला मारहाण करीत चादरीने बांधण्यात आले.
त्याच्याकडून मोबाइल आणि कम्पाउंडच्या गेटची चावी हिसकावून घेतली. राजस्थान लिकर गोडावूनचे कुलूप लोखंडी टामीने तोडून सीग्राम कंपनीच्या रॉयल स्टॅग मद्याचे वेगवेगळे ३७० बॉक्स आयशर वाहनातून लंपास केले. हे मद्य २६ लाख ९४ हजार २०३ रुपयांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, निरीक्षक गणेश न्याहाळदे हे तपास करीत आहे.