नाशिक (प्रतिनिधी): कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे शहरात पालिकेच्या वतीने मोरवाडी व गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. या प्लांटमुळे हॉस्पिटल्सला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. महापालिका आयुक्तांनी या जागेची पाहणी करून नियोजनाबाबतच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.
शहर व परिसरात काही दिवसांपासून ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने मोरवाडी व गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट साकारण्यात येत आहे. त्यासाठी मोरवाडी येथील यूपीएससीलगतच्या मोकळ्या मैदानाचे व प्रबोधनकार ठाकरे सभागृह येथील बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी नाशिक महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांनी केली.
गंगापूर यूपीएससी बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करून या दोन्ही ठिकाणी एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या प्लांटच्या माध्यमातून जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरून देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
यावेळी मोरवाडी दवाखान्याची पाहणी करून तेथील कामकाजाची व औषध साठ्याची माहिती यावेळी आयुक्त जाधव यांनी घेतली. तसेच गंगापूर येथील दवाखान्याची पाहणी करून तेथील औषधसाठा व रुग्णांना मनपाच्या वतीने दिली जात असणाऱ्या सेवेचीदेखील माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयूर पाटील, नितीन नेर, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कोशिरे आदींसह अधिकारी उपस्थित होते.