म्हाडाचे घर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून तब्बल २८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक (प्रतिनिधी): म्हाडाचे घर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना २८ लाख ८५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित किशोर सरोदे (रा. हरी विश्व, पाथर्डी फाटा) या संशयिताच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी फाटा येथे राहणारे नितीन भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनची म्हाडाची जाहिरात दाखवत या योजनेत स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखविले. संशयिताने भोळे, त्यांची पत्नी कल्पना आणि नातेवाईक भावना कोल्हे, त्यांच्या ओळखीचे वंदना चौधरी गायत्री महाले यांच्याकडून वेळोवेळी प्रत्येकी ४ ते ६ लाख रुपये घेतले.
दोन वर्षे होऊनही घर मिळत नसल्याने म्हाडा कार्यालयात चौकशी केली असता अशाप्रकारे कुठलेही घर स्वस्तात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार दिली. संशयित किशोर सरोदे यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.