नाशिक (प्रतिनिधी): आठवडाभरापूर्वी जुने नाशिक भागातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी गळतीमुळे तब्बल २४ कोरोनाबाधितांच मृत्यू झाल्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयाने मृत व्यक्तींच्या वारसांना दोन लाख रुपये तर गंभीर आजारी झालेल्या रुग्णांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी महापालिकेकडून मृत रुग्ण तसेच गंभीर असलेल्या रुग्णांची यादी मागवली आहे.
गेल्या बुधवारी डॉ. हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती लागून २४ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. बरेच रुग्ण सुधारण्याची शक्यता असताना निव्वळ ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यू होत असल्याचे बघून नातेवाइकांनी वाचवण्यासाठी शर्थ केली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. मात्र शंभरपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यशस्वी ठरले होते. ही दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत रुग्णांच्या वारसांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने जाहीर केली तसेच पालिकेच्या वतीनेदेखील महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. आता पंतप्रधान कार्यालयाने मृत रुग्णांच्या वारसांना दोन लाख रुपयांची तर गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
त्या संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी नाशिक महापालिकेला पत्र पाठवून या दुर्घटनेत मृत झालेल्या रुग्णांची तसेच गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांची यादी पाठवण्याची मागणी केली आहे. अाॅक्सिजन गळती दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्यातच पीएअाेकडूनही मदत जाहीर झाली अाहे.