नाशिक (प्रतिनिधी): निर्मितीपेक्षा अधिक ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी लागत असल्याने आता इंडस्ट्रीला देण्यात येणारा पुरवठा शासनानेच बुधवारपासून बंद करत तो वैद्यकीय कारणांसाठी वळविण्याचा निर्णय घेतला आहे.
रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी तीन स्वतंत्र अधिकाऱ्यांवर
कोरोना रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याने त्यावर त्वरित नियंत्रण यावे, यासाठी आता जिल्ह्यात तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक शहरात मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अाष्टेकर, मालेगाव शहरासाठी वैद्यकीय अधिकारी सपना ठाकरे तर नाशिक ग्रामीण भागासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.
आपापल्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजनच पुरवठा देण्यासाठी हे अधिकारी नियुक्त करण्यात आल्याने आता रुग्णालयांना ऑक्सिजन नाही अशी तक्रार करण्याची संधी राहणार नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, रुग्णांची संख्या अन् ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडवरील रुग्ण वाढत आहे. पण त्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. खासगी रुग्णालय असोसिएशनने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी (दि. १४) बैठकीत केली. या बैठकीत ठरल्यानुसार तीन स्वतंत्र अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. हे तीनही अधिकारी ऑक्सिजनची आवश्यकता, मागणी याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार असून जिल्हाधिकारी संबंधित ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजन या अधिकाऱ्यांद्वारे त्या-त्या रुग्णालयांना पुरवेल.
त्यामुळे आता सर्वच रुग्णालयांना गरजेनुसार ऑक्सिजन उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. आॅक्सिजनच्या उपलब्धतेचीही नोंद होणार असल्याने ऑक्सिजनच्या काळ्याबाजारावरही नियंत्रण येईल, असा विश्वास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.