नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयांनी सी बी आर एस कार्यप्रणालीत भरती रुग्णांची नोंद वेळोवेळी न केल्या प्रकरणी दोन खाजगी रुग्णालयांना नोटिसा देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिली.
सोमवार दि.५ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी अचानक मेडीलिव्ह हॉस्पिटल व न्यू आधार हॉस्पिटल या २ रुग्णालयांची पाहणी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांचेसह सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे व सीबीआरएस सिस्टिमचे अजय अहिरे या पथकाने केली. त्यात नाशिक महानगर पालिकेतर्फे सी बी आर एस कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.
परंतु गेल्या काही दिवसापासून असे निदर्शनास आले आहे की खाजगी रुग्णालय सीबीआर ए सिस्टीम मध्ये भरती रुग्णांची नोंद वेळोवेळी करत नाहीत. या सिस्टीमवर बेड रिकामा आहे असे दिसते. परंतु वस्तुस्थितीमध्ये या बेडवर रुग्ण भरती असतो. यामुळे नवीन कोरोना रुग्णांना भरती करणे कामी अनंत अडचणी निर्माण होतात. याचे संपूर्ण परीक्षण करणे कामी केलेल्या पाहणीत भरती रुग्णांची नोंद वेळोवेळी न केल्याचे आढळून आले असल्याने त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
यानंतर शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांनी सीबीआर सिस्टीम वर भरती रुग्ण बाबतची खरी माहिती त्वरित अपडेट करावी असे आवाहन करण्यात येत आहे.मात्र यानंतर कोणत्याही खाजगी रुग्णालयाकडून सीबीआर सिस्टीम वर भरती रूग्णाबाबतची माहिती रोजच्या रोज भरली नसल्याचे आढळून आल्यास त्या सर्व रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मा.अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिला आहे.