नाशिक (प्रतिनिधी): कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या जलद होण्याचा मार्ग मोकळा झाला असून नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालयातील महापालिकेच्या मॉलिक्युलर लॅबला आयसीएमआरची मान्यता मिळाली आहे.
आज (दि. १ एप्रिल) रोज तीन ते चार हजार कोरोना चाचण्या या लॅबच्या माध्यमातून होणार आहेत..
नाशिकच्या रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रथम औरंगाबाद व त्यानंतर पुणे, मुंबईच्या लॅबकडे पाठवत होते. मात्र, रिपोर्ट येण्यास उशीर होत असल्याने प्रादुर्भाव वाढत होता. दुसरीकडे, बिटकोत लॅबसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला होता. मात्र, तांत्रिक अडचणी येत होत्या.
तसेच आयसीएमआरची मान्यता बाकी होती. या प्रस्तावास आज आयसीएमआरने मान्यता दिली. गुरुवारपासून येथे चाचण्या सुरू होणार आहे. ही लॅबसाठी पुरेशा स्टाफची नियुक्ती केली असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.