नाशिक (प्रतिनिधी): जानेवारीत कोरोना नियंत्रणात असल्याचा बुरखा फेब्रुवारीत फाटल्यानंतर मार्चच्या पहिल्या ११ दिवसांत तब्बल साडेचार हजार कोरोनाबाधित आढळल्यामुळे महापालिकेची यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे.
एवढेच नव्हे तर, १२ मार्च रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नाशिकमध्ये कोरोनाचा प्रसार ८० टक्के वेगाने होत असल्याबाबत चिंता व्यक्त करतानाच पुणे, सातारा, सांगलीसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉटबाबत नाशिक पहिल्या स्थानावर असल्याचे लक्षात घेत प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मनपा आयुक्त कैलास जाधव हेच गर्दी नियंत्रणासाठी बाजारपेठेसह हॉटेल्स, बारमध्ये फिरून नियम मोडणाऱ्यांना दंड करताना दिसत आहेत.
मुख्य सचिवांच्या बैठकीचे इतिवृत्त स्थानिक पातळीवर पाठवले असून त्यात, पुणे, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, नंदुरबार, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर नाशिकबाबत सर्वाधिक चिंता व्यक्त करण्यात आली.