नाशिक (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला कडाकडून विरोध करण्यासाठी देशपातळीवरील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची नऊ संघटनांनी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे आता १७ मार्चला (बुधवारी) नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरीरिएन्टल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या चार जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे तर १८ मार्च (गुरुवारी) एलआयसीचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. जिल्ह्यातील एलआयसीचे किमान एक हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते.
डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने एक अध्यादेश काढत विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढविली. या अध्यादेशाला कायद्याचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे, केंद्र सरकारच्या या खासगीकरण धोरणाला विरोध करण्यासाठी देशातील जनरल इन्शुरन्स आणि एलआयसीचे कर्मचारी या संपात उतरणार आहेत. विशेष म्हणजे, बँक कर्मचारी सोमवारी व मंगळवारी संपावर असल्याने बँकिंगचे कामकाज ठप्प राहणार आहे. विमा क्षेत्रातील लागोपाठ दोन दिवस कर्मचारी संपावर जाणार असल्याने खासगी विमा कंपन्या वगळता सरकारी सगळ्याच विमा कंपन्यांचे कामकाज ठप्प होणार आहे.