नाशिक (प्रतिनिधी): शहरातील कॉलेज रोड व परिसरातील दोन हॉटेलमध्ये अचानक व्हिजिट करून पाहणी केली असता त्या ठिकाणी ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहक असल्याने व सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्याने या दोन्ही हॉटेलवर पाच हजार रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई आयुक्त कैलास जाधव यांनी स्वतः केलेली आहे.
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असून त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहे.
त्यातील एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका व नाशिक शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव,पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, मनपा व पोलीस विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने कॉलेज रोड परिसरातील हॉटेलची पाहणी केली.
त्यातील हॉटेल पकवान, जेहान सर्कल गंगापूर रोड व ग्रीन फिल्ड कृष्णा हॉटेल, कॉलेज रोड या दोन हॉटेलमध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन न होणे व आसन क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहक असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांच्या पाहणीच्या वेळी निदर्शनास आले.
संबंधित हॉटेल व्यवसायीकांवर जागीच पाच हजार रुपयांचा दंड करून कार्यवाही करण्यात आली आहे.
तसेच मास्क न वापरणाऱ्या वर देखील कार्यवाही करणेत आली आहे.सर्वांनी कोरोना बाबतचे नियम पाळण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.