नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नव्याने लागू केलेल्या निर्बंधानुसार हॉटेल्स, परमिट रूम, बार, रेस्टॉरंट अशी प्रवेश आणि निर्गमनाची व्यवस्था असलेले बंदिस्त अस्थापना रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र रस्त्याच्या कडेची, चौकातील, उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या हातगाड्या सायंकाळी ७ पर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.. याबाबतचे स्पष्ट आणि स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गुरुवारी (दि. ११ मार्च) दिले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अत्यावश्यक सेवा व दुकाने वगळता सर्वच बाबींवर सायंकाळी सातनंतर बंदी लागू कऱण्यात आली असून यातून केवळ हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, परमिट रूम यांना नऊ वाजेपर्यंत सूट दिली आहे. तर पार्सल किचन रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. यात खाद्यपदार्थांच्या हातगाड्याही रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी होती. मात्र या गाड्यांभोवती गर्दी होत असल्याने त्यांच्यावर बंदी लादण्यात आली आहे.. शनिवारी, रविवारीही त्या पूर्णपणे बंदच असतील. केवळ हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, परमिट रूम या आस्थापनांना ५० टक्के टेबल आणि कर्मचारी संख्येनुसार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
चिकन, मटण, अंडी दुकाने शनिवारी, रविवारीही सुरू
चिकन, मटण,अंडी हे सर्व अन्नपदार्थ असल्यामुळे जीवनावश्यक या प्रवर्गात मोडतात. त्यामुळे त्याची विक्री दुकाने शनिवार व रविवारी सुरू राहतील. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक
सायंकाळी ७ नंतर खाद्य-पदार्थांच्या गाड्या बंद
आता सायंकाळी ७ वाजेनंतर चायनीज गाडी, पाणीपुरी, भेलपुरीसह समोसा, वडापाव या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.