नाशिक (प्रतिनिधी): विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगांव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमधील महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय 8 मार्च पासून सुरु करण्यात येणार आहे. या विभागीय कार्यालयामुळे महिलांच्या तक्रारींचे निवारण होणार असल्याची माहिती, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी एका शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने 10 फेब्रुवारी 2021 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय 8 मार्च 2021 पासून सुर करण्यात येणार आहे. या कार्यालयामार्फत महिलांना तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच यासाठी पोलीस स्टेशनचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.
महिलांसदर्भातील अति महत्वाच्या गंभीर स्वरुपाच्या किंवा सु-मोटो नोंद घ्यावयाच्या तक्रारीबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल. तसेच या कार्यालयामार्फत प्रस्तावित किंवा नियोजित सुनावण्या ह्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या कामकाजासाठी विधी सल्लागार, संरक्षण अधिकारी, समुपदेशक व लिपीक पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही, उपायुक्त श्री. पगारे यांनी दिली आहे.
नाशिक विभागातील अत्याचाराने पिडीत असलेल्या महिलांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास विभाग, नाशिक विभाग नाशिक, नासर्डी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड येथे संपर्क साधावा. तसेच 0253, 2237422 या दूरध्वनी क्रमांकावर, division.nashik@rediffmail.com या ईमेल आयडीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन, विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.