पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासही मान्यता…!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यामार्फत सूरू करण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे सतत प्रयत्न सुरू होते.यासाठी त्यांनी अनेक बैठका ह्या वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व संबंधित अधिकाऱ्यांसोबत घेतल्या होत्या.
याबाबत माहिती देताना भुजबळ म्हणाले की नाशिक हा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मुंबई-पुणे खालोखाल तिसरा मोठा जिल्हा आहे.नाशिक जिल्ह्यात ७ आदिवासी तालुके असून एकूण लोकसंख्येच्या २३% आदिवासी लोकसंख्या आहे त्यामुळे जनहिताचा विचार करता या मेडिकल कॉलेजची गरज भासत होती. मेडिकल कॉलेज झाले पाहिजे ही नाशिककरांची गेले अनेक दिवसांपासूनची मागणी होती. यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मी सातत्याने यासाठी प्रयत्न करत होतो आज मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे.
या महाविद्यालया बाबत बोलताना . भुजबळ पुढे म्हणाले की मुंबईसारख्या शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांचा विकास व आधुनिकीकरण जागेअभावी मर्यादा आल्या असल्याने त्याला पर्याय म्हणून उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण आणि आत्याधुनिक आरोग्य सेवा देऊ शकेल असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे विकसित करता येणे आता शक्य आहे. नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त असणार आहे. यात उच्च शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक दर्जाचे संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्ययावत आरोग्य सेवा सुविधा असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सदर वैद्यकीय महाविद्यालय आम्ही राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांसाठी रोल मॉडेल म्हणून विकसित करू असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.