नाशिक (प्रतिनिधी): प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे आता पूर्व प्राथमिक म्हणजेच इयत्ता पहिली ते चौथीची शाळा मार्च महिन्यापासून सुरु करण्याचा शासन विचार करतआहे. तसा प्रस्तावही शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती समजते आहे; मात्र यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. कोरोना काळात गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालये बंद होती.
मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु केल्यानंतर माध्यमिकच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळाही सुरु झाल्या आहेत.
त्यामुळे आता कोरोनाच्या सर्व खबरदारीचे काटेकोरपणे पालन करून पूर्व प्राथमिक शाळा सुरु करता येऊ शकतात असा निष्कर्ष शिक्षण विभागाने काढला आहे.
१ मार्चपासून या शाळा सुरु करून एप्रिल अखेरपर्यंत दोन महिन्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्यांची शाळेत जाण्याची गोडी तुटू नये म्हणून फक्त दोनच महिने काही तासांसाठी शाळा सुरु करण्याचा विचार आहे.