नाशिक (प्रतिनिधी): घर खरेदीत करताना फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहे. ही बाब लक्षात घेत आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील बांधकाम प्रकल्पाची माहिती पालिका तयार करत असलेल्या एका हेल्पलाइन क्रमांकाद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे ज्यांना घर खरेदी करायचे असेल, त्यांना संबधित बांधकाम प्रकल्पास पालिका परवानगीपासून ते रहीवासी झोनपर्यंत आवश्यक पूर्तता केली आहे का याची माहिती मिळणार आहे. जेणेकरून प्रकल्पाबाबत वाद असेल तर ग्राहकाला फसवणुकीपासून वाचता येणार आहे.
अप्रामणिक विकसकांकडून ग्राहकांची फसवणूक होण्याची भिती असल्याने या पार्श्वभूमीवर नगररचना विभागामार्फत आता या टोल फ्री क्रमांकावर बांधकाम प्रकल्पाचे नाव सांगितले की, ग्राहकांना पूरक माहिती मिळणार आहे.
इमारत किंवा घर उभारण्यासाठी जागा निवासी क्षेत्रात आहे का? बांधकाम परवानगी किंवा पूर्णत्वाचा दाखला घेता आहे का, जागेवर आरक्षण आहे का वा, जागा आर्टीलरी सेंटरच्या फनेल झोनमध्ये आहे का तसेच शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम केले जात आहे का, इमारतीचे सामासिक अंतर, योग्य रस्त्यावर बांधली जात आहे का? जागा मालकांमधील वाद कोर्टात आहे का आदी माहिती ग्राहकांना या हेल्पलाइनवर उपलब्ध होणार आहे.