नाशिक (प्रतिनिधी) : पैशाच्या कारणावरून एका खासगी सावकाराने २ ओळखीच्या व्यक्तींना आपल्या साथीदारांच्या मदतीने जबरदस्ती आडगाव परिसरातील नांदूर लिंक रोड या ठिकाणी नेले. दरम्यान, या दोघांना सावकाराने बंदुकीचा धाक दाखवत अमानुष मारहाण केली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबन रामभाऊ शिंदे (वय ३५, रा. मु.चाडेगाव पो.कोमटगाव) व त्यांचा भागीदार प्रविण हे दोन्ही शेवंता लॉन्स समोर,नांदूर शिवार आडगाव, जत्रा नांदूर लिंक रोड येथील काकाश्री हॉटेल या ठिकाणी बसले होते. दरम्यान, मंगळवारी (दि.१९ जानेवारी) रोजी संशयित आरोपी आबा चौधरी व त्याचे ६ ते ७ साथीदार तेथे आले. तसेच पैशाच्या कारणावरून फिर्यादीस व त्यांच्या भागीदारास जबरदस्ती शिवीगाळ करून पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा चारचाकीत बसवले. तर, गंगावाडी एकलहरा नाशिकरोड येथे मोकळ्या जागेत घेऊन आले.
त्यानंतर, फिर्यादीस व त्यांच्या भागीदारास मानेवर, पाठीवर, हातावर, काठ्या तसेच गजने अमानुष मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत, हातातील बंदुकीचा धाक दाखवत संशयित आरोपी चौधरी याने फिर्यादी व प्रविण यांना संपवूनच टाकतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.