नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील कामगारनगर परिसरात राहणाऱ्या डॉ.पाटील यांच्या घरावर अज्ञात चोरटयांनी डल्ला मारला. दरम्यान, भरदिवसा चोरटयांनी घरातून तिजोरीसह १५ लाख किमतीचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. नरेंद्र पाटील हे कामगारनगर मधील मधुरमैत्री या १२ मजली बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर राहतात. दरम्यान, बुधवारी (दि.१३ जानेवारी) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी डॉ. पाटील यांच्या फ्लॅटचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान, कपाटातील तिजोरी तुटत नसल्याने तिजोरीसह चोरटयांनी पलायन केले. तसेच तिजोरीत अंदाजे ८ तोळे सोने व चांदीच्या वस्तू होत्या तर, काही रोख रक्कम असे एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.