नाशिक (प्रतिनिधी) : नायलॉन मांजामुळे बळी जाणे, गळा कापला जाणे अशा अनेक घटना शहरात समोर आल्या होत्या. त्यानुसार, पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे सत्र सुरु झाले आहे. दरम्यान, सिडको येथून एका विक्रेत्यास ४० हजार २०० किंमतीच्या नायलॉन मांजासह ताब्यात घेण्यात आले आहे.
संक्रात निमित्त शहरात पतंग उडवण्यासाठी नायलॉन व काच असलेला मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार, संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अजय शिंदे, यांच्या पथकाने मोतीलाल महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली.
दरम्यान, (दि.८ जानेवारी) रोजी शिवशक्ती चौक, सिडको येथे अमित उर्फ सनी बाळासाहेब दाभाडे (वय २९, रा.कामटवाडा) यास नायलॉन मांजा विक्री करतांना ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून, एकूण ४० हजार २०० किंमतीचे ६२ गट्टू जप्त करण्यात आले असून, त्याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, अभिजित सोनवणे, वसंत खतेले, पोलीस उप निरीक्षक मिथुन म्हात्रे, विजय लोंढे व पथकाने केली.