नाशिक (प्रतिनिधी) : शहरात नायलॉन मांजामुळे बळी जाणे व गळा कापला जाणे या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीसांनी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ कडून सातपूर पोलीसठाणे हद्दीतील पिंपळगाव बहुला येथील एका नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे इंदिरानगर परिसरात तरुणाचा तर, मखमलाबाद-हनुमानवाडी येथे तरुणीचा गळा कापला गेला होता. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र, पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्या आदेशानुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने, मोतीलाल महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. त्यानुसार, गुरुवारी (दि.७ जानेवारी) २०२१ रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सातपूर पोलीस ठाणे हद्दीत पिंपळगाव बहुला येथून प्रसाद रमेश धनराळे यास नायलॉन मांजा विक्री करताना ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याच्याकडून एकूण १९ हजार ४०० रुपये किंमतीचे २९ रीळ जमा केले असून, त्यास पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस हवालदार रमेश घडवाजे, संपत सानप, संतोष ठाकूर, मोतीलाल महाजन, संतोष माळोदे, महेंद्र साळुंखे, बाळा नांद्रे, गौरव गवळी जयंत शिंदे व महिला पोलीस शिपाई कोमल यादव इत्यादींनी केली आहे.