नाशिक (प्रतिनिधी): कोरोनामुळे मागील बऱ्याच महिन्यांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. मुलांच्या परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.परंतु, आता कोरोना रुग्णांची संख्या बरीच कमी झाल्याने नववी ते बारावीचे वर्ग काल (दि.४ ) पासून सुरु करण्यात आले. यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने व्यावसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नियोजनाबाबत डॉ. व्ही.बी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठामध्ये नियोजन समितीचे आयोजन केले होते. या आयोजित बैठकीमध्ये महाविद्यालये सुरु करण्याबाबतच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाकडून नाशिक,नगर व पुणे या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालये ११ जानेवारी पासून सुरु केली जाणार आहे. यासाठी पारंपरिक व अपारंपारिक महाविद्यालये असे दोन टप्पे करण्यात आले आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरु असून या अभ्यासक्रमांची थिअरी आणि प्रॅक्टिकल्स ११ जानेवारी पासून सुरु होणार आहे.