नाशिक (प्रतिनिधी) : अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या बालकाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच एक घटना घडली. वडिलांनी आपल्या प्रेयसीच्या नावे दिड एकर जमीन केल्याने, मुलाने जाब विचारला असता वडिलांनी आपल्या २८ वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून हत्या केल्याची घटना सोमवारी (दि.४) नाशिक – पुणे रोडवरील जनरल वैद्यनगर येथे घडली आहे.
याप्रकरणाची फिर्याद मृत मुलाची आई व संशयित यांची बायको जयश्री माळवाड यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे मृत मुलगा निलेश माळवाड हा आपल्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामध्ये अडसर ठरत असल्याने व वडिलांनी आपल्या प्रेयसीच्या नावे केलेल्या शेतीबद्दल सतत विचारपूस करीत असल्याचा राग वडिलांनी मनात ठेऊन ‘तुझा गेम करतो’ अशा वेळोवेळी धमक्या देत असत. मुलगा निलेश रात्री झोपला असता संशयित वडील पशुवैद्यकीय अधिकारी प्रभाकर माळवाड हे त्याच्या म्हणजेच मुलाच्या बेडरूममध्ये घुसले व त्याच्या छातीवर बसून गळा आवळत त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित वडिलांना अटक केली आहे.