नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील ठक्कर बाजार बसस्थानकापासून एक वृद्ध व्यक्ती रिक्षात बसून अंबड परिसराच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, त्यांच्या खिशातील २० हजार २०० रुपये त्यांच्या सोबत असलेल्या २ अज्ञात प्रवाश्यांनी धक्काबुक्की करून लांबविले.
पोलिसांना तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २० डिसेंबर) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भीमराव जाधव (वय ६३, रा.जयहिंद कॉलनी) हे ठक्कर बाजार येथून रिक्षात बसले. जाधव यांना रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या २ अज्ञात व्यक्तींच्या मध्ये बसवले. त्यामुळे त्या दोन्ही प्रवाश्यांनी वाद घातला. थोड्या अंतरावर जाऊन रिक्षा पेट्रोल पंपावर थांबवून, रिक्षाचालकाने देखील वाद घालत भाडे न घेताच जाधव यांना रिक्षातून उतरवून दिले. दरम्यान, जाधव यांनी स्वतःचे खिसे तपासले असता त्यांचे २० हजार २०० रुपये चोरले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सदर प्रकारात रिक्षाचालकाचा देखील हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.