नाशिक (प्रतिनिधी) : सणवार असो की, आंदोलन यामध्ये दिवसभर उन्हातान्हात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक वेळा जेवण व पाण्याविनाच तैनात राहावे लागते. यामुळे समाजातील रक्षकाच्या आरोग्याच्या काळजीपोटी व त्यांना पोटभर जेवण मिळावे म्हणून, नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुसार, पोलीस ज्या ठिकाणी बंदोबस्तावर असतील थेट त्याठिकाणी त्यांना पोटभर जेवण व पाणी देण्यात येत आहे.
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून, पोलीस बांधवांच्या हिताचे बरेच निर्णय घेतले आहेत. यामध्ये सुरुवातीला पोलीस कोविड सेंटर सुरु केले, त्यांनतर फिव्हर- कोमॉर्बिडिटी क्लीनिक व आता हा उपक्रम यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मंगळवारी (दि.८ डिसेंबर) रोजी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सकाळी ७ वाजेपासून बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. अशावेळी जेवणाचा डब्बा सोबत आणणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. म्हणून, दिपक पांडे यांच्या संकल्पनेतून, पोलीस आयुक्तालयतर्फे मंगळवारपासून, बंदोबस्ताच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांसाठी भाजी, चपाती, डाळ, भात, केळी व पाण्याची बाटली असे फूड पॅकेट पोहचवण्यात आले. याचा सर्व खर्च पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात येत आहे. तसेच यापुढेही हा उपक्रम अशाचप्रकारे राबवण्यात येईल.