नाशिक (प्रतिनिधी): सरकारी कार्यालयात आता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पेहरावासंदर्भात नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्य सरकारच्या सर्व शासकीय कार्यालयात येतांना जिन्स, टी-शर्ट, भडक रंगाचे कपडे, नक्षीकाम केलेले व रंगीबेरंगी कपडे परिधान करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
सर्वच शासकीय कार्यालयात नेहमीच लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक तसेच अधिकारी इत्यादींची ये-जा सुरु असते. तसेच बऱ्याच वेळा अधिकारी तथा कर्मचारी यांना सामान्य नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधावा लागतो.
यामुळे त्यांची थेट संबंधितांवर छाप पडत असते, त्यामुळे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून, सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पेहराव हा महत्वाचा भाग आहे. जर अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय, विचित्र व अस्वच्छ असेल तर जनमानसातील प्रतिमेला तडा जाऊ शकतो. म्हणून, सामान्य प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांसाठी साडी, सलवार- चुडीदार, कुर्ता, आवश्यक असल्यास ओढणी, तर ट्राउझर, पॅन्ट व त्यावर कुर्ता असा पेहराव असावा. चपला, सॅंडल, बूट, शूज, यांचा वापर करावा. अशा सूचना केल्या आहेत. तसेच पुरुषांसाठी शर्ट- पॅन्ट असा पेहराव असावा व पोशाख हा स्वच्छ व नीटनेटका असावा. तर बूट, सॅंडल यांचा वापर करावा. स्लीपर घालण्यास मनाई आहे.