नाशिक। दि. २७ नोव्हेंबर २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये राबविण्यात येत आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांना पुन्हा गणना प्रपत्र (Enumeration Form) भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी शनिवार, २८ नोव्हेंबर 2026 व रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या अनुपस्थित अथवा स्थलांतरित पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले गणना प्रपत्र भरून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या सुधारित वेळापत्रकानुसार गणना प्रपत्र तयार करणे व मुद्रित करणे, प्रपत्रांचे वितरण व संकलन तसेच प्रपत्रांची निकाली काढण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.त्यानुसार प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या अनुपस्थित व स्थलांतरित मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत गणना प्रपत्र भरून देण्याची संधी देण्यात आली आहे. दावे व हरकतींचा निपटारा १५ डिसेंबर २०२६ पर्यंत करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या अनुपस्थित अथवा स्थलांतरित पात्र मतदारांना गणना प्रपत्र दाखल करता यावे, यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सर्व बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर उपस्थित राहून मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांशी संपर्क साधतील व त्यांच्याकडून गणना प्रपत्र भरून घेतील. नागरिकांनी विशेष नोंदणी शिबिरांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


