Amazon

नाशिक: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ‘या’ मतदारांना पुन्हा संधी; वाचा सविस्तर…

नाशिक। दि. १४ नोव्हेंबर २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत गणना प्रपत्र भरूनही अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) व दुबार (Duplicate) अर्थात ASDD प्रवर्गात समाविष्ट झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ न शकलेल्या मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

संबंधित मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन गणना प्रपत्र भरून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महसूल सेवक (कोतवाल) पदभरती परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी !

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात आले होते. या प्रक्रियेत ASDD प्रवर्गात समाविष्ट झालेल्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे गणना प्रपत्र भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संबंधित मतदारांची जुनी माहिती भरलेले गणना प्रपत्र ECINet प्रणालीद्वारे संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना उपलब्ध होणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या माध्यमातून हे प्रपत्र संबंधित मतदारांपर्यंत प्रत्यक्ष, व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच मतदारांना निवडणूक संकेतस्थळ अथवा ECINet प्रणालीवर आपला EPIC क्रमांक नोंदवून गणना प्रपत्र डाउनलोड करून ते भरता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवृत्तीवेतनधारकांसाठी स्मार्टफोनवरून हयातीचा दाखला सादर करण्याची डिजिटल सुविधा

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संबंधित राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या समन्वयाने मतदारांशी संपर्क साधतील. तसेच मतदारांचे शेजारी, नातेवाईक, स्थानिक रहिवासी आणि रहिवासी कल्याणकारी संस्थांच्या माध्यमातूनही संपर्क साधून गणना प्रपत्र भरण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात येणार आहे.

मूळ निवासस्थानावरून स्थलांतरित न झालेल्या मतदारांना गणना प्रपत्रासोबत जोडपत्र-ब सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र, मूळ निवासस्थानावरून स्थलांतरित झालेल्या मतदारांनी जोडपत्र-बमध्ये आपला नवीन पत्ता आणि संबंधित विधानसभा मतदारसंघाची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. अशा मतदारांनी सध्याच्या निवासस्थानाशी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे गणना अर्ज सादर करावा.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात २४ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

ASDD प्रवर्गातील मतदारांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://nashik.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही ज्यांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करायचे आहे, अशा मतदारांनी गणना प्रपत्र भरून ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-६ भरलेला असल्यास संबंधित मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची आवश्यकता नाही, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790