Amazon

नाशिक: धरणात बुडून पिता आणि दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू; परिसरात शोककळा

नाशिक। दि. ११ नोव्हेंबर २०२६ : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बेझे धरणात आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे वाघेरे आणि अंजनेरी परिसरात शोककळा पसरली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रब्बी ज्वारीच्या सुधारित वाणांचे बियाणे आता १०० टक्के अनुदानावर; शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

नाशिक जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, वाघेरे येथील भोर कुटुंबीय हे येथील उत्तम चव्हाण यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. बुधवारी सकाळी ९.३० ते १०.३० वाजेच्या दरम्यान हे तिघे बेझे धरणाच्या परिसरात आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने हल्ला; पतीविरोधात गुन्हा दाखल

या दुर्घटनेत सुरेश नामदेव भोर (वय ४२), ज्योती सुरेश भोर (वय १०) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७) यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाच्या मदतीने तिघांचेही मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

एकाच कुटुंबातील पिता आणि दोन लहान मुलींचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची अधिकृत माहिती त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790