Amazon

नाशिक: रब्बी ज्वारीच्या सुधारित वाणांचे बियाणे आता १०० टक्के अनुदानावर; शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

नाशिक जिल्ह्यात रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक। दि. ११ नोव्हेंबर २०२६: सद्यस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थिती आणि कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेता, रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढविणे तसेच पशुधनासाठी उत्तम प्रतीचा चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत (पौष्टिक तृणधान्य) सन २०२६-२७ मध्ये रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट वितरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खरेदीच्या बहाण्याने सराफा दुकानात चोरी; १२ सोन्याच्या अंगठ्यांचा ट्रे घेऊन चोरटे पसार

रब्बी ज्वारी हे तुलनेने अत्यंत कमी पाण्यात येणारे महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून, जनावरांसाठीही उत्कृष्ट दर्जाचा चारा या पिकातून उपलब्ध होतो. कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी पर्याय उपलब्ध करून देणे, संभाव्य टंचाईचे दुष्परिणाम कमी करणे आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविणे या उद्देशाने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत रब्बी हंगामामध्ये रब्बी ज्वारी पिकाच्या मागील दहा वर्षांतील सुधारित वाणांचा प्रसार करून उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी १०० टक्के अनुदानावर प्रति शेतकरी ४ किलो बियाण्याचे एक मिनीकिट वितरित करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने हल्ला; पतीविरोधात गुन्हा दाखल

असा करा ऑनलाइन अर्ज:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Agrilogin/Agrilogin या संकेतस्थळावर लॉगिन करून ‘सीड किट / मिनीकिट’ या पर्यायांतर्गत वैयक्तिकरीत्या अर्ज करता येईल.

योजनेच्या महत्त्वाच्या अटी व बाबी:
लाभार्थी निवडीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Preference) या तत्त्वाचा अवलंब करण्यात येणार आहे.
शासनाच्या धोरणानुसार अर्ज करणाऱ्या व योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे वैध शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे अनिवार्य आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असल्याने शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावा.

🔎 हे वाचलं का?:  दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३.६८ कोटी रुपयांची मदत !

नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी तातडीने ऑनलाइन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी अथवा गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790