Amazon

नाशिक: चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने हल्ला; पतीविरोधात गुन्हा दाखल

नाशिक। दि. ९ नोव्हेंबर २०२६: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने तिच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारात घडली. एवढेच नव्हे, तर धक्काबुक्की करून तिला जिन्याच्या पायऱ्यांवरून खाली पाडल्याने ती गंभीर जखमी झाली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये थंडीची चाहूल; आज (दि. ८) किमान तापमान १४.२ अंशांवर

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित पतीला दारूचे व्यसन असून तो वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घालत असे. तसेच तिला मारहाणही करत होता. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिला सुमारे दहा महिन्यांपूर्वी आपल्या भावाकडे राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, नातेवाइकांनी मध्यस्थी करून समजूत काढल्यानंतर ती गेल्या महिन्यात पुन्हा सासरी परतली होती.

🔎 हे वाचलं का?:  दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३.६८ कोटी रुपयांची मदत !

शनिवारी (दि. ७) रात्री संशयित पती दारूच्या नशेत घरी आला. त्याने पुन्हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नीने विरोध केला असता, त्याने धमकी देत चाकूने वार केला. या हल्ल्यात महिलेच्या डाव्या कानाखाली मानेवर चाकू लागून गंभीर जखम झाली. याशिवाय धक्काबुक्कीमुळे ती रो-हाऊसच्या वरच्या मजल्यावरून जिन्याच्या पायऱ्यांवरून खाली पडली. यात तिच्या पाठीला, खुब्याला, हाताला आणि कमरेला मुका मार लागला.

🔎 हे वाचलं का?:  दिवाळीतच नाशिकमध्ये थंडीची चाहूल; किमान तापमान १४.३ अंशांवर

घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मावशीने आणि भावाने तिला तातडीने तपोवन रोडवरील सद्गुरू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिच्या मानेवरील जखमेवर टाके घातले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पीडित महिलेने आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार सुनील बहीरम करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790