Amazon

नाशिक: ‘या’ ठिकाणी उभारणार ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन; ९९.९९ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता

नाशिक। दि. ७ नोव्हेंबर २०२६: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर शहराच्या विकासाला आधुनिकतेची जोड मिळणार आहे. भगूर नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ई-व्हेईकल) चार्जिंग स्टेशन उभारण्यासह महिला कौशल्य विकास केंद्र, हिरकणी केंद्र, सार्वजनिक शौचालय, वॉटर एटीएम आणि पर्यटनाच्या दृष्टीने व्ह्यू पॉइंट व सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत.

या विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एकूण ९९ लाख ९९ हजार ८१६ रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या पुढाकाराने भगूर नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रस्तावाला ही मान्यता मिळाली असून यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले.

ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशनमधून पालिकेला उत्पन्न:
भगूर नगरपरिषदेच्या नगरभूमापन क्रमांक ९८१ मधील मालकीच्या जागेवर ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. वाहनधारकांकडून नियमानुसार चार्जिंग शुल्क आकारून नगरपरिषदेला स्वतःच्या मालमत्तेतून नियमित उत्पन्न मिळविण्याची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळण्यासोबतच नगरपरिषदेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  महावितरणची ‘अभय योजना’ जाहीर! थकित वीजबिलांवरील व्याज-दंड १००% माफ; मूळ रकमेतही २०% पर्यंत सूट

सावरकरांच्या जन्मभूमीला भेट देणारे पर्यटक तसेच नाशिक, देवळाली आणि परिसरातील नागरिकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. चार्जिंग व बॅटरी स्वॅपिंग स्थानकांसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार लागू असलेल्या सवलतीच्या वीजदरांमुळे परिचालन खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ नुसार २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक चार्जिंग सुविधांची उपलब्धता वाढविणे महत्त्वाचे आहे. भगूरमधील हा उपक्रम इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला स्थानिक पातळीवर प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.

महिलांसाठी कौशल्य विकास व हिरकणी केंद्र:
सार्वजनिक आरोग्यविषयक सुविधांसाठी ४९ लाख ३१ हजार ३६७ रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. नगरभूमापन क्रमांक २३४/२ मधील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत महिला कौशल्य विकास केंद्र, हिरकणी केंद्र आणि सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होतील. स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा निर्माण होण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध होणार आहे. मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  गोदावरी प्रदूषणावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारवर नाराजी; २१ नोव्हेंबरपर्यंत कृती अहवाल सादर करण्याचे आदेश

दत्तमंदिर व शिवाजी चौकात वॉटर एटीएम:
शहरातील नागरिक आणि पर्यटकांना शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी दत्तमंदिर चौक आणि शिवाजी चौक येथे वॉटर एटीएम कार्यान्वित करण्यात येणार आहेत. प्रमुख चौकांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधांच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

क्रांतीचौकात व्ह्यू पॉइंट, सेल्फी पॉइंट:
पर्यावरण व पर्यटनविषयक कामांसाठी ५० लाख ६८ हजार ४४९ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात क्रांतीचौक, भगूर येथे व्ह्यू पॉइंट आणि सेल्फी पॉइंट उभारण्याचा समावेश आहे. सावरकरांच्या ऐतिहासिक स्मृतींशी जोडलेल्या या परिसरात आकर्षक पर्यटन सुविधा निर्माण झाल्यामुळे भगूरच्या पर्यटन ओळखीला नवी दिशा मिळणार आहे. ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन आणि पर्यटन सुविधांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना मिळेल.

🔎 हे वाचलं का?:  सीबीएसई बोर्ड १०वी, १२ वी परीक्षा १६ फेब्रुवारीपासून

विशेष अनुदानातून विकासकामांना गती:
ही सर्व कामे ‘वैशिष्ट्यपूर्ण’ कामांसाठी विशेष अनुदान (लेखाशीर्ष २२१७ १३०१) तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियाना’अंतर्गत करण्यात येणार आहेत. या अभियानातून नगरपरिषदांना नागरी सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे नियोजन आहे. भगूर नगरपरिषद ही या कामांची कार्यान्वयन यंत्रणा राहणार आहे.

मुख्याधिकारी, भगूर नगरपरिषद यांच्या २ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या प्रस्तावानुसार या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहेत.

ई-व्हेईकल चार्जिंग सुविधा, महिलांसाठी स्वतंत्र केंद्र, शुद्ध पिण्याचे पाणी आणि पर्यटनविकास अशा विविधांगी सुविधांमुळे भगूर शहराच्या नागरी विकासाला नवी चालना मिळणार आहे. ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक आणि पर्यावरणपूरक शहराच्या दिशेने भगूरची वाटचाल या विकासकामांमुळे अधिक गतिमान होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790