विमानतळावरील प्रवाशांच्या विरोधानंतर २४०० रुपयांची कोरोना चाचणी आता ८०० रुपयांत !

नाशिक (प्रतिनिधी) : ओझर विमानतळावर प्रवाशांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत होती. सदर चाचणी एका खासगी रुग्णालयामार्फत २४०० रुपयांमध्ये करण्यात येत होती. मात्र, चाचणीचा दर जास्त असल्याने प्रवाशांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे आता ही चाचणी ‘मविप्र’च्या लॅबमार्फत करण्यात येत आहे. ही चाचणी आता ८०० रुपयात करण्यात येणार आहे.. त्यानुसार, विमानतळावर गुरुवारी (दि.२६ नोव्हेंबर) रोजी प्रवाशांनी विरोध न दर्शविता चाचणी करून घेतली.

गुजरात, गोवा, दिल्ली व राजस्थान या ४ राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश देतांना त्यांच्याकडे कोरोना चाचणी निगेटिव्हचा अहवाल असणे बंधनकारककरण्यात आले आहे. तसेच जर अहवाल नसेल तर संबंधित विमानतळावरच कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश आहेत. बुधवारी (दि.२५ नोव्हेंबर) विमानतळावर दिल्ली व अहमदाबादवरून आलेल्या काही प्रवाशांकडे चाचणी अहवाल नव्हते. त्यानुसार चाचणी करण्यास सांगण्यात आले असता, १० ते १५ प्रवाश्यांनी २४०० रुपयांची चाचणी खर्चिक असल्याने म्हणत विरोध केला. मात्र, विरोध करणाऱ्या प्रवाशांनी नंतर संगमनेर येथे चाचणी केल्याचे व्हिडीओ विमानतळ अथॉरिटीला पाठवले असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची बाजू लक्षात घेत शासनाने सर्वसामान्यांना परवडेल अशा ८०० रुपये दराने चाचणी करण्याची व्यवस्था केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790