मुंबई। दि. २० ऑक्टोबर २०२६: रेल्वेच्या डब्यात मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडीओ पाहणे किंवा स्पीकरवर ऑडिओ सुरू ठेवून सहप्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून, दक्षिण रेल्वेने या नियमांच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरही याबाबत हालचाली सुरू आहेत.
स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे रेल्वेच्या डब्यांमध्ये मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडीओ पाहणे तसेच मोबाइलवर मोठ्याने बोलण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शांततेत प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. सहप्रवाशांनी विनंती करूनही काही जण आवाज कमी करत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवतात. या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. गंभीर किंवा वारंवार नियमभंग करणाऱ्यांना डब्यातून अथवा रेल्वे परिसरातून बाहेर काढण्याची कारवाईही होऊ शकते. तसेच सातत्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी सहा महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद असल्याचे सांगण्यात आले आहे.
दक्षिण रेल्वेने आपल्या सर्व विभागांना परिपत्रक जारी करून अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीही रेल्वे मंडळाने प्रवासादरम्यान मोबाइल वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. डब्यात मोठ्याने बोलणे, दीर्घकाळ मोठ्या आवाजात फोनवर संभाषण करणे आणि इतर प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या रिंगटोनचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला होता.
दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडूनही या नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. तिकीट तपासनीसांसह वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही रेल्वे विभागांमध्ये नियमांची अंमलबजावणी नेमकी कधीपासून सुरू होणार, याबाबत लवकरच तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
![]()


