Amazon

नाशिकमध्ये बसस्थानकांवरील दागिने चोरीचा पर्दाफाश; 24.43 लाखांचे सोने जप्त

नाशिक। दि. १५ ऑक्टोबर २०२६: शहरातील बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने अटक केली आहे. संशयितांकडून २४ लाख ४३ हजार रुपये किमतीचे, १६३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मेळा, महामार्ग आणि निमाणी बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनांच्या तपासातून ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे जावेद अब्दुल गफ्फार (४०) आणि अरुणकुमार प्रेमदत्त शर्मा (५६) अशी आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. हे संशयित २०२४ पासून नाशिक शहरात सक्रिय असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: ध्वजारोहण सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे- आयुक्त शेखर सिंह

शहरातील विविध बसस्थानकांवर प्रवाशांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. याचदरम्यान गुन्हे शाखा युनिट-१ मधील अंमलदार आप्पा पानवळ, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे आणि राम बर्डे यांना बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याबाबत कळविले.

🔎 हे वाचलं का?:  व्यापाऱ्यांना दिलासा: यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर अंमलबजावणी दिवाळीनंतर !

पोलिस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे आणि रमीज शेख यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान बसस्थानकांवर दागिने चोरीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

मदतीचा बहाणा करून वृद्ध प्रवाशांना लक्ष्य:
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित शहरात फिरस्त्यांप्रमाणे वावरत आणि बसस्थानकांवर वारंवार ठिकाण बदलत असत. गर्दीच्या वेळी बसमध्ये चढणाऱ्या वृद्ध प्रवाशांना मदत करण्याचा बहाणा करून त्यांच्या जवळ जात आणि संधी साधून दागिने चोरत असत. या पद्धतीने त्यांनी चोरी केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटींमध्ये शासनाकडून शिथिलता!

या कारवाईमुळे बसस्थानकांवरील दागिने चोरीच्या घटनांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. संशयितांचा अन्य चोरीच्या गुन्ह्यांतील सहभाग आणि या प्रकरणामागे आंतरराज्यीय टोळी कार्यरत आहे का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790