नाशिक। दि. १२ ऑक्टोबर २०२६: जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांना मारहाण करत सोन्याची चेन आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या प्रकरणात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ने एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. प्रेम ऊर्फ साई मोनू राणा (रा. महालक्ष्मी मंदिराजवळ, लॅमरोड, देवळाली कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.२० वाजण्याच्या सुमारास देवळाली कॅम्प परिसरात घडली. फिर्यादी आणि त्यांचे मित्र डॉमिनोज पिझ्झाच्या ऑर्डरचे काम पूर्ण करून परिसरात थांबले होते. त्यावेळी प्रेम ऊर्फ साई राणा आणि त्याच्या साथीदाराने जुन्या भांडणाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्याशी वाद घातला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयितांनी शिवीगाळ करत दोघांना मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि पॅन्टच्या खिशातील रोकड जबरदस्तीने काढून घेत दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर फिर्यादीने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध गुन्हे शाखा युनिट-२चे पथक घेत होते.
दरम्यान, संशयित प्रेम ऊर्फ साई राणा हा लॅमरोड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना याबाबत कळविण्यात आल्यानंतर त्यांनी माहितीची खातरजमा करून कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान जुन्या भांडणातून वाद झाल्यानंतर मारहाण करून जबरी चोरी केल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, प्रकाश महाजन आणि पोलीस अंमलदार मनोज शिंदे यांच्या पथकाने केली.
![]()


